Sunday, August 6, 2017

जिओ आणणार व्हॉट्सअॅपचं विशेष व्हर्जन


            सध्या मार्केटमध्ये स्मार्टफोन्सची धुमाकूळ आहे. दर दुस-या दिवशी एक नवा स्मार्टफोन लाँच होताना दिसतो. मात्र जिओफोन या सर्वांपेक्षा वेगळा असल्याचा दावा केला जात आहे. यासोबत फोनमधील अनेक फिचर्स वेगळे असल्याचंही सांगण्यात येत आहे. सर्व काही जमेचं असताना एक गोष्ट मात्र जिओफोनमध्ये नाही जी तोटा देणारी ठरु शकते. या फोनमध्ये भारतीयांचं आवडतं अॅप व्हॉट्सअॅप मेसेंजर अॅप नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, जिओने यासाठीही कंबर कसली असून व्हॉट्सअॅपचं विशेष व्हर्जन आणण्याची तयारी केली जात आहे. फॅक्टर डेलीने दिलेल्या वृत्तानुसार, जिओ यासंबंधी व्हॉट्सअॅपशी बातचीत करत आहे. 
          मिळालेल्या माहितीनुसार, जिओ आणि व्हॉट्सअॅप मिळून एक विशेष व्हॉट्सअॅप व्हर्जन आणणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या यासंबंधी प्राथमिक चर्चा सुरु आहे. जिओच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'सध्या चर्चा सुरु आहे. आमचे फेसबूकसोबत चांगले संबंध आहेत. काही तांत्रिक समस्या आहेत. आम्हाला एक असं व्हॉट्सअॅप व्हर्जन हवं आहे, जे जिओ फोनवर व्यवस्थित काम करु शकेल'. 
         व्हॉट्सअॅपला भारतात येऊन जास्त काही वेळ झालेला नाही. मात्र कमी काळातच हे अॅप प्रचंड प्रसिद्द झालं असून स्मार्टफोन वापरणा-याकडे हे अॅप नसणं जरा कठीणच. हे मेसेजिंग अॅप शहरांपासून ते गाव खेड्यांमध्ये सगळीकडे वापरले जात असून सर्वांच्या आवडत्या यादीत आहे. लोक एसएमएसचा वापर न करता व्हॉट्सअॅपचाच वापर करताना दिसतात. एखादा मेसेज पाठवण्यापासून ते फाईल पाठवण्यापर्यंत सर्व सोयी यामध्ये उपलब्ध असल्याने लोक व्हॉट्सअॅपला पसंती देतात. 
          जिओफोनमध्ये जी ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे, ती व्हॉट्सअॅपला सपोर्ट करत नाही. हा फोन KaiOS वर काम करेल, जे फायरफॉक्स OS चं छोटं व्हर्जन आहे. 
            जिओफोनमध्ये जर व्हॉट्सअॅपची सुविधा असली, तर याचा मुकेश अंबानींच्या रिलायन्सला प्रचंड फायदा होईल. व्हॉट्सअॅपमुळे देशाच्या कानाकोप-यातून लोक जिओकडे आकर्षित करण्यात मदत मिळेल. व्हॉट्सअॅप नसणं जिओफोनसाठी तोट्याचं ठरु शकतं. जिओने आपला जिओचॅट पर्याय दिला आहे, मात्र त्याचे युझर्स फार कमी आहेत. 
         जिओ 4 जी व्होल्ट फोनची इफेक्टिव्ह किंमत शून्य आहे. मात्र 1500 रुपयांचं सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागणार असून, तीन वर्षांनंतर पूर्ण रिफंड मिळणार आहे. जिओचा नवा फोन 24 ऑगस्टनंतर प्रीबुक करता येणार आहे.
           रिलायन्स जिओच्या या फोनमध्ये 2.4 इंच डिस्प्ले आणि 512 एमबी रॅम असणार आहे. तसेच 4 जीबी इंटर्नल स्टोरेज सुविधा असेल. तर 128 जीबी मेमरी कार्डची सुविधाही देण्यात आली आहे. 2 मेगा पिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि VGA फ्रन्ट कॅमेरा असणार आहे. याचबरोबर या फोनमध्ये डेडिकेटेड की असणारी टॉर्च लाइट दिली आहे. तर 2000mAh इतकी बॅटरी सुद्धा असेल. 

No comments:

Post a Comment