Sunday, August 6, 2017

मीयुआय ९: काय आहेत फिचर्स ?

शाओमी कंपनीने आपला मीयुआय या युजर इंटरफेसची नववी आवृत्ती जारी केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
अँड्रॉइड या प्रणालीपासून मीयुआय विकसित करण्यात आला आहे. स्मार्टफोन, टॅबलेट आदी उपकरणांमध्ये याचा वापर केला जातो. विशेष करून शाओमीच्या उपकरणांमध्ये हा युजर इंटरफेस प्रि-इन्टॉल्ड या अवस्थेत प्रदान करण्यात येतो. शाओमीने अल्पावधीतच मारलेली मुसंडी पाहता जगभरातल्या ३० कोटीपेक्षा जास्त स्मार्टफोन्समध्ये मीयुआय वापरण्यात येत असल्याचा एक अंदाज आहे. ऑगस्ट २०१० मध्ये मीयुआय या युजर इंटरफेसची पहिली आवृत्ती लाँच करण्यात आली होती. यानंतर अँड्रॉइड ज्या पध्दतीने विविध व्हर्जन्सच्या माध्यमातून विकसित होत गेले, अगदी त्याच पध्दतीने मीयुआय देखील विकसित झाले. या अनुषंगाने नुकतेच अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर आधारित मीयुआय ९ ही अद्ययावत आवृत्ती सादर करण्यात आली आहे. यातील लक्षवेधी फिचर्स खालीलप्रमाणे आहेत.
* एक तर मीयुआय ९ ही आवृत्ती अधिक गतीमान आहे. यामुळे यावर विविध अ‍ॅप्स हे अतिशय वेगाने उघडू शकतात. यामध्ये स्प्लीट स्क्रीन हे फिचर असल्यामुळे एकाच वेळी दोन अ‍ॅप्स वापरणे शक्य आहे.
* मीयुआय ९ या आवृत्तीमध्ये इमेज सर्च करण्याची सुविधा आहे. यावर स्मार्टफोनच्या गॅलरीमध्ये असणार्‍या प्रतिमांना कि-वर्डच्या मदतीने सर्च करता येणार आहे. यात लोकेशन, भावमुद्रा, डॉक्युमेंट, इव्हेंट, स्क्रीनशॉट आणि लोकांच्या नावांनी त्यांच्याशी संबंधीत प्रतिमांचा शोध घेता येईल.
* मीयुआय ९ मध्ये स्मार्ट असिस्टंट असेल. कृत्रीम बुध्दीमत्ता म्हणजेच आर्टीफिशियल इंटिलेजियन्सच्या मदतीने हा असिस्टंट युजरला विविध माध्यमातून मदत करणार आहे. सध्या अनेक कंपन्या डिजीटल असिस्टंटवर भर देत असल्यामुळे हे फिचर शाओमीला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
* मीयुआय ९ या आवृत्तीत स्मार्ट अ‍ॅप लाँचर प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने स्क्रीनवर तात्काळ एखादे अ‍ॅप सुरू होऊ शकते. उदाहरणार्थ कुणी व्हाटसअ‍ॅप अथवा फेसबुक मॅसेंजरवर चॅटींग करत असतांना लोकेशनबाबत चर्चा सुरू केली तर त्या युजर्ससमोर तत्काळ गुगल मॅप्स उघडेल.
* उर्वरित फिचर्सचा विचार केला असता मीयुआय ९ या आवृत्तीत नो बाऊंडरी, कलर फँटसी आणि कूल ब्लॅक या तीन डिफॉल्ट थीम्स असतील. तर याच्या लॉक स्क्रीनसाठी नवीन डिझाईन देण्यात आली आहे.
केव्हा उपलब्ध होणार ?
मीयुआय ९ ही प्रणाली ११ ऑगस्टपासून ग्राहकांना डाऊनलोडच्या स्वरूपात वापरता येणार आहे. शाओमीने अलीकडेच लाँच केलेल्या मी ५ एक्स या मॉडेलमध्ये मीयुआय ९ प्रदान करण्यात आली आहे. याशिवाय पहिल्या टप्प्यात शाओमी मी ६ आणि रेडमी नोट ४ एक्स या मॉडेलला हे अपडेट मिळेल. २५ ऑगस्टपासून याच्या अपडेटचा दुसरा टप्पा सुरू होणार असून यात मी मॅक्स, मी नोट २, मी ५, मी ५एस, मी५एस प्लस, मी५सी, मी मॅक्स२, मी४एस, मी४सी, मी नोट प्रो आणि रेडमी ४ एक्स या मॉडेलचा यात समावेश आहे. तर २५ सप्टेंबरपासून शाओमीच्या अन्य सर्व उपकरणांमध्ये मीयुआय ९ उपलब्ध होणार आहे.

No comments:

Post a Comment